Ad will apear here
Next
सब कुछ लुटा के होश में आए...


हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘अभिनयाचे महाविद्यालय’ म्हणून ज्यांना ओळखले जाते, त्या अशोककुमार यांचा १३ ऑक्टोबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज घेऊ या त्यांच्या उत्तम अभिनयाचा दाखला असलेल्या ‘सब कुछ लुटा के होश में आए...’ या गीताचा आस्वाद...
............
अशोककुमार! हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘दादामुनी!’ या कलावंताला अभिनयाचे महाविद्यालय म्हणतात! एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि सुंदर अभिनय ही अशोककुमारची वैशिष्ट्ये! ‘बॉम्बे टॉकीज’ या जुन्या चित्रसंस्थेचा हा नायक! देविकाराणीचा हिरो! त्या काळात म्हणजे १९३५ ते १९४५च्या दशकात हा जरी डोक्यावरचे केस तेल चोपडून चप्पट बसवलेले असला, त्याचे मोठ्ठाले डोळे काजळ माखल्यागत वाटत असले, तरी तो प्रेक्षकांना आवडायचा! त्याचा तुकतुकीत कोवळा चेहरा बघण्यासाठी प्रेक्षक यायचे. लीला चिटणीस त्याची नायिका असायची! त्याचे त्या काळातले अद्भुत कन्या, कंगन, बंधन, झुला हे चित्रपट लोकांना भावले होते. ‘मैं बन का पंछी बन बन डोलू रे...’, ‘नाव चली मेरी नाव चली...’ अशी गाणी त्याने पडद्यावर व प्रत्यक्षात गायली होती! होय, अशोककुमार हा गायक नट होता! 

बदलत्या काळानुसार त्याने आपला ‘लूक’ बदलला, पोशाख बदलला! त्याच्या अभिनयात परिपक्वता येऊ लागली आणि त्याच जोरावर ‘किस्मत’मधील ‘अँटी-हिरो’ची भूमिका त्याने साकार केली. लोकांना तो प्रचंड भावला! लोक त्याला बघायला वारंवार ‘किस्मत’च्या वाऱ्या करू लागले. आणि ‘किस्मत’ हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक वेगळा चित्रपट ठरला! एका चित्रपटगृहात सलग तीन वर्षे चाललेला तो पहिला चित्रपट ठरला!

विविधता हे त्याच्या अभिनयाचे वैशिष्ट्य होते. ‘मेरी सूरत तेरी आँखे’ या चित्रपटाचा नायक काळाकुट्ट आणि बदशकल होता; पण तसा नायक साकारण्याचे आव्हान अशोककुमारने स्वीकारले आणि यशस्वी करूनही दाखवले. प्रेमळ पिता अगर दादाजी म्हणून शोभणाऱ्या अशोककुमारने ‘जवाब’ या चित्रपटात खलनायकी भूमिका केली होती. खरा ‘ज्वेल थीफ’ अशोककुमारच असतो, हे रहस्य विजय आनंदने ‘ज्वेल थीफ’ चित्रपटात छान रंगवले होते. तेथेही एक वेगळा अशोककुमार पाहायला मिळाला होता. ‘गुमराह’ चित्रपटात आपल्या पत्नीचे वाकडे पाऊल लक्षात येऊनही आक्रस्ताळेपणा न करता संयमाने तिला धडा शिकवणारा धीरोदात्त नायक त्याने शानदारपणे साकार केला होता. चरित्र नायकाच्या भूमिकेत आल्यानंतर ‘व्हिक्टोरिया नं २०३’मधील प्राणबरोबर त्याचा धिंगाणा त्याच्या वेगळ्या अभिनयाचा दाखला देणारा होता.

अशा विविध भूमिका करणारा हा अभिनेता त्याच्या तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना रसायनशास्त्राचा पदवीधर झाला होता. नंतर वकिलीचा अभ्यासही त्याने सुरू केला होता. चित्रपटात येण्याचा विचारही तेव्हा त्याच्या डोक्यात नव्हता. ‘बॉम्बे टॉकीज’च्या हिमांशू रॉय यांच्याकडे त्याने टेक्निशियन बनण्याचे शिक्षण घेतले. त्यांनीच अशोककुमारला अभिनयाकडे वळवले आणि १९३५चा ‘जीवन नैया’ हा त्याचा पहिला चित्रपट आला; पण त्याचे चित्रपटात जाणे घरच्यांना आवडले नव्हते. आश्चर्य म्हणजे एकट्या अशोक कुमारच्या मागोमाग कालांतराने त्याच्या परिवारातले अनेक जण चित्रपटसृष्टीत दाखल झाले. त्यामध्ये त्यांचे दोन्ही भाऊ किशोरकुमार आणि अनुपकुमार हे तर होतेच; पण पुढील काळात कन्या प्रीती गांगुली, जावई देवेन वर्मा आणि नात अनुराधा पटेल (मुलीची मुलगी) असे अनेकजण चित्रपटसृष्टीत आलेले दिसून येतात.

अभिनयात वाकबगार असलेल्या अशोककुमार यांनी होमिओपॅथी उपचारपद्धतीचा अभ्यास केला होता. ज्योतिषशास्त्राबद्दल त्यांना रुची होती. गाण्याची आवड होती. चित्रपटसृष्टीतून मिळालेल्या पैशाच्या आधारे त्यांनी नऊ चित्रपटांची निर्मिती केली होती. आपल्या कारकिर्दीतील आपले उत्कृष्ट रोल कोणते, कोणत्या भूमिका तुम्हाला जास्त आवडल्या, या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी ‘कानून’ आणि ‘गुमराह’ चित्रपटातील भूमिकांचा उल्लेख केला होता. अनेक कलांची हौस असलेल्या अशोककुमार यांनी अभिनेता इफ्तेकार यांच्याकडून चित्रकलेचेही धडे घेतले होते. 

कुमुदलाल कुंजीलाल गांगुली असे मूळ नाव असलेले अशोककुमार १३ ऑक्टोबर १९११ रोजी जन्मले होते आणि एक संपन्न आयुष्य जगून, आपल्या अनेक उत्कृष्ट भूमिकांचे चित्रपट मागे ठेवून, एका समाधानी मनाने त्यांनी १० डिसेंबर २००१ रोजी या जगाचा निरोप घेतला. आज त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, त्यांच्यावर चित्रित झालेल्या ‘एक साल’ या १९५७च्या चित्रपटातील एक सुनहरे गीत पाहू या!

एखादे ऐकण्याआधी ते ज्या पार्श्वभूमीवर चित्रपटात येते, ती पार्श्वभूमी जाणून घेतल्यास त्या गीताचा आशय, गर्भितार्थ समजण्यास मदत होते. (हिंदी चित्रपटातील प्रत्येक गीताला हे विधान लागू होणार नाही.) ‘एक साल’चे हे गीत अशा पार्श्वभूमीवर सुरू होते. या चित्रपटाचा नायक अशोककुमार हा या चित्रपटाची नायिका मधुबाला हिच्यावर प्रेमाचे नाटक करत असतो. कारण एका दुर्धर आजाराने तिचा अल्प काळात मृत्यू होणार असतो. त्यामुळे तिची इस्टेट त्याला मिळणार असते; पण नायकाचे हे खोटे प्रेम नायिका खरे मानते. ती त्याच्यावर जिवापाड प्रेम करू लागते. आणि पुढे काही काळाने नायकाच्या ते लक्षात येते तेव्हा त्याच्या मनाची द्विधा अवस्था होते. हिचे खरे प्रेम आपण स्वीकारायचे का? आपण स्वार्थी भावनेने का वागलो? काय केले आपण हे?

माणसाच्या जीवनात अनेकदा असे स्वतःच्याच मनात द्वंद निर्माण होत असते. गीतकाराने लिहिलेले हे गीत दिग्दर्शकाने चित्रपटाच्या या कथानकाच्या अनुषंगाने वापरलेले असले, तरी ते आपल्यालाही ‘आपलेच’ वाटते. कारण कधी तरी आपल्या जीवनातही असा प्रसंग येतो, की आपण एखाद्या तात्कालिक, सामान्य फायद्यासाठी चिरकालीन किंवा उदात्त भावना ठोकरलेली असते. ती सुवर्णसंधी घालवलेली असते. आणि कालांतराने ती चूक लक्षात आल्यावर पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हातात काहीच नसते.

आणि असे पश्चाताप झालेले आपले दुसरे मन आपल्याला म्हणते -

बदला दिया तो क्या दिया उनके प्यार का

मन म्हणते - आम्ही पानगळीच्या ऋतूकडून (खिजा) वसंत ऋतूचा सौदा करत गेलो; अपेक्षा करत गेलो (आणि आम्ही हे काय केले) त्यांनी आमच्यावर उत्कट प्रेम केले व त्या बदल्यात आम्ही त्यांना काय दिले?
पश्चातापदग्ध मन पुढे म्हणते –

सब कुछ लुटा के होश में आए तो क्या किया 
दिन ने अगर चराग जलाए तो क्या किया

आमचे सर्वस्व लुटून गेल्यावर आम्ही शुद्धीवर आलो (पण) त्याचा काय उपयोग? (जसा) दिवसा दिवे प्रज्ज्वलित केल्यावर त्याचा काही उपयोग नसतो (तसा). 

हम बदनसीब प्यार की रुसवाई बन गए 
खुद ही लगाके आग तमाशाई बन गये 
दामन से अपने शोले बुझाये तो क्या किया

आम्ही कसे कमनशिबी आहोत ते बघा! या प्रेमाच्या प्रांतात बदनामीच आमच्या पदरात पडली. आम्ही स्वतःच ही (प्रेमाची) आग लावली आणि स्वत:चे हसे करून घेतले. (आम्ही लोकांच्या कुत्सित हास्याचा विषय बनलो) (आणि इतकं सारं झाल्यावर आम्ही आमच्या) पदरातील या ज्वाला विझवून टाकल्या, त्याचा आता काय उपयोग?

ले ले के हार फूलों के, आई तो थी बहार 
नज़रे उठा के हमने ही, देखा ना एक बार 
आँखों से ये परदे हटाये तो क्या किया
 
पुष्पांच्या मला घेऊन वसंत ऋतू कसा आमच्या जीवनात आला होता (प्रेयसी आमच्यावर जीव ओतून प्रेम करत होती आणि आम्ही कसे कमनशिबी बघा की) आम्ही नजर वर करून एकदाही तिच्याकडे पाहिले नाही. (तिच्या प्रेमाला प्रतिसाद दिला नाही) (आमच्या नजरेपुढे तिच्या प्रेमाव्यतिरिक्त दुसरंच काही होतं; पण आज ते दूर झालं आहे आणि ती करत होती त्या प्रेमाची जाणीव झाली आहे.) पण आता डोळ्यांवरील हा पडदा दूर होऊन तरी काय उपयोग आहे?

गीतकार प्रेम धवन यांनी लिहिलेले हे गीत संगीतकार रवी यांनी साजेशा संगीतात गुंफले होते. आणि तलत मेहमूद यांनी ते गायले होते. हे गीत आपण पडद्यावर बघतो, तेव्हा नायकाची दोन मने नायकाच्या रूपात आपल्याला दिसतात. अशोककुमारसारखा समर्थ अभिनेता ते दोन मनांचे भाव आपल्या अभिनयाने उत्तमपणे साकारतो. सादरीकरण, शब्द, संगीत, स्वर या सर्वच अनुषंगाने ‘सुनहरे’ असलेले हे गीत अशोककुमार यांची स्मृती जागवणारे!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZUBCH
Similar Posts
सब कुछ लुटा के होश में आए.... हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेले एक सुरेख आणि सुंदर स्वप्न म्हणजे मधुबाला! जिचे सौंदर्य आणि अभिनय एक आख्यायिका बनून राहिले आहे, अशा मधुबालाचा जन्मदिन १४ फेब्रुवारीला, तर स्मृतिदिन २३ फेब्रुवारीला असतो. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या तिच्यावर चित्रित झालेल्या ‘सब कुछ लुटा के होश में आए
सीने में सुलगते है अरमाँ... प्रेम धवन हे जुन्या काळातील एक प्रतिभासंपन्न गीतकार! अनेक चित्रपटांसाठी आशयसंपन्न गीते लिहिलेल्या या गीतकाराचा १३ जून हा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या प्रेम धवन यांनी लिहिलेल्या ‘सीने में सुलगते है अरमाँ...’ या गीताचा...
रहा गर्दिशों में हरदम... संगीतकार आणि गीतकार रवी यांचा जन्मदिन तीन मार्चला असतो, तर स्मृतिदिन सात मार्चला असतो. त्या औचित्याने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या रवी यांनी संगीतबद्ध केलेल्या एका गीताचा...
‘तुम तो दिल के तार छेडकर...’ हिंदी चित्रपटसृष्टीत ज्याच्या आवाजातील गाण्यांचा एक स्वतंत्र चाहतावर्ग आजही आहे, असा गायक कलावंत म्हणजे तलत मेहमूद. नऊ मे हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या तलत मेहमूद यांच्या आवाजातील ‘तुम तो दिल के तार छेडकर...’ या गीताचा...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language